24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeउस्मानाबादतुळजाभवानीचे दुसर्‍या माळेला हजारो भाविकांनी घेतले दर्शन

तुळजाभवानीचे दुसर्‍या माळेला हजारो भाविकांनी घेतले दर्शन

एकमत ऑनलाईन

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी ): शारदीय नवरात्र उत्सवात कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मांदीयाळी भरण्यास सुरुवात झाली आहे. अश्विन शु.2, शके 1943 शुक्रवारी (दि.8) शारदीय नवरात्रीच्या दुसर्‍या माळेला हजारो भाविकांनी भक्तीभावाने तुळजाईचे दर्शन घेतले. आई राजा उदो उदोच्या गजरात भाविक भक्त मंदीरात दाखल होत होते. पहाटे 1 वा.चरणतीर्थ पूजा होऊन मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

दुसर्‍या माळेला सकाळी 6 वा. पूजेची घाट देण्यात आली. त्यानंतर देवीस अभिषेक करण्यात आले. यावेळी देवीला पंचामृत अभिषेक स्नान घालण्यात येते. सिंहासन पूजा संपन्न झाल्यानंतर देवीला वस्त्र, अलंकार परिधान करण्यात आले. यावेळी मंहत तुकोजीबुवा, वाकोजीबुवा , पुजारी आदींची उपस्थिती होती. नवरात्रात देवीसाठी विशेष दागिने वापरण्यात येतात. नवरात्रीच्या दुसर्‍या माळेला देवीस केशरी रंगाचा शालू नेसविण्यात आला होता. नक्षीदार असलेला बुट्टेदार शालू देवीवर खुलून दिसत होता. मस्तकावर सुवर्णमुकूट ठेवण्यात आला होता. त्यावर नाजूक कलाकुसर असलेली ओमचिन्हे कोरण्यात आली आहेत.

देवीला रत्नजडित सुवर्णनेत्र लावण्यात आले होते. भाळावर हळदी चंदनाचा लेप लावून बाजूस कुंकवाचा मळवट भरण्यात आला होता. हळदीचंदनाच्या लेपावर शुद्धचंदनाने ओम रेखण्यात आले. नाकात माणिक मोती जडित सुवर्णनथ घालण्यात आली. यानंतर देवीस प्राचिन दागदागिन्यांनी मढवण्यात आले. यात सोन्याच्या सातपदरी माळा, मोतीमाळा आदी दागिन्यांनी सजवण्यात आले. प्राचिन पुरातन दागिने घालण्यात आले. तुळजाभवानीची धुपारती करून अंगारा काढण्यात आला. देवीचे हिरव्यागर्द शालूतील मनोहारी रूप पाहून भाविक भक्तीरसात दंग झाले. आई राजा उदो उदोच्या गजरात हजारो भाविकांनी देवीच्या अलौकिक रुपाचे मनोभावे दर्शन घेतले.

नवरात्रीच्या येणार्‍या काळात भाविकांचा ओघ वाढता आहे. शहरात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असून शहरात येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. शहराच्या बाहेर वाहनाची पार्कींग व्यवस्था केली आहे. नगर पालिका प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता केली असुन लाईट व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र,सज्ज ठेवली आहेत. तत्पूर्वी गुरुवारी रात्री प्रक्षाळपूजा संपन्न होऊन मोर वाहनावरून छबिना काढण्यात आला. देवीची चांदीची उत्सवमूर्ती छबिन्याच्या वाहनावर ठेऊन मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा घालत छबीना काढण्यात आला. यावेळी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, महंत तुकोजीबुवा, देवीचे पुजारी, भोपे मंडळाचे अध्यक्ष, पाळकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्य पुजारी मंडळाचे अध्यक्ष, सेवेधारी, मंदीर व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या