20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeउस्मानाबादशारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी तुळजापूरची यात्रा रद्द, पण भावीकांना दर्शन घेता...

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी तुळजापूरची यात्रा रद्द, पण भावीकांना दर्शन घेता येणार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : राज्य शासनाने मंदिर उघडण्या अनुषंगाने निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मंदिर संस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी तीन दिवसीय यात्रा यावर्षी भरवण्यात येणार नाही. पण यानिमित्ताने सर्व पूजा आणि विधी होणार असून भावीकांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेता येणार आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन, तुळजापूरचे तहसीलदार तथा विश्वस्त सदस्य सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान योगिता कोल्हे, पोलिस अधिकारी काशीद, वाय.एम.बागुल, सिध्देश्वर इंतुले, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह भराडे, तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंचला बोडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विजय चिंचाळकर, एस.टी.चे विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर, अश्वजीत जानराव, जिल्हा पुरवठा विभागातील सचिन काळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.व्ही.घोडके, कर्नाटक एस.टी. महामंडळाचे आर.बी.जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे, महामार्ग 52 चे देवेंद्रसिंग, राष्ट्रीय महामार्गाचे अनिल विपट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी.बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शारदीय नवरात्र महोत्सवातील सर्व पूजा, विधी सर्व प्रकारचे पावित्र्य राखण्यात येईल. भक्तांना दर्शनाची सोयही कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापूर शहरात कोरोना लसीकरणाचे विशेष शिबीर घेण्यात येत आहेत. प्रामुख्याने पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांबरोबरच संबंधित प्रशासकीय अधिकारी, मंदिर संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे लसीकरण करण्यास भर देण्यात येत आहे. नवरात्र महोत्सव काळातील यात्रा बंदी असली तरी पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांकडून करण्यात येणारी पूजा आणि इतर विधी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे, असे सांगून यानिमित्त आवश्यक त्या सर्व प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने वाहतुकीचे व्यवस्थापन, बॅरिकेटींग, सुरक्षा, आरोग्य विषयी बाबींवर अधिक भर देण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.

या महोत्सवानिमित्त सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्यांचे काम व्यवस्थीत सुरु असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे.तसेच नगरपालिकेने बसविलेले काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही.कॅमेरे सुरु करण्याची गरज असेल तर तेही काही मंदिर संस्थानतर्फे करण्यात येणार आहे, असे सांगून श्री.दिवेगावकर यांनी समाज विघातक आणि समाज कंटकाच्या हद्दपारीची कार्यवाही पोलिसांनी तातडीने करावी. तसेच समाज माध्यमातून जनतेत भितीचे वातारण पसरवणाऱ्यांचाही बंदोबस्त करावा. अवैध दारु आणि अंमली पदार्थावर बारीक नजर ठेवण्यात यावी. याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालावे. या नवरात्र महोत्सवानिमित्त ज्याकडे जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत त्यांची नावे, फोन नंबर 29 सप्टेंबर 2021 च्या दुपारपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास संबंधित कार्यालय प्रमुखाने कळवावी, असेही ते म्हणाले.

या महोत्सवानिमित्त वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंर्तगत कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.दिवेगावकर यांनी सांगितले. यावेळी आमदार पाटील यांनीही विविध सूचना करत हा महोत्सव यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती कोल्हे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या महोत्सवातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या