मुंबई : प्रतिनिधी
महिला शेतक-यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत आणि कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ३७ लाख ९३ हजार ०५१ अर्ज प्राप्त झाले असून ८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिला शेतक-यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी, यासाठी कृषी विभागाकडून नोंदणीला वेग देण्यात येत आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६’ विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार महिला शेतक-यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख, समान अधिकार तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामसभा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत पात्र महिला शेतक-यांना प्रमाणपत्र वितरित केले जात आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर नोंदणी होत आहे.
अर्जसंख्येत यवतमाळ जिल्हा २ लाख ५३ हजार ४३९ अर्जांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ सातारा २ लाख १४ हजार ७८७, नाशिक २ लाख १० हजार ३२७, अमरावती २ लाख ०५ हजार ०७४ आणि पुणे जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ०४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बुलढाणा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, नांदेड, धाराशिव, धुळे, बीड आणि जालना या जिल्ह्यांतही एक लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. तालुकानिहाय नोंदणीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुका ३५ हजार ४२२ नोंदणीसह आघाडीवर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात विविध विभागांच्या तुलनेत कृषी विभागात सर्वाधिक नोंदणी झाल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले. उर्वरित पात्र महिला शेतक-यांनीही ऑनलाइन नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
















