इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात काश्मीरवरून केलेल्या चिथावणीखोर भाषणाची परिणती काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला होण्यात झाली होती. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. तसेच भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डयांना लक्ष्य करून या हल्ल्याचा बदला घेतला होता. याआधी एप्रिल महिन्यात आसिम मुनीर याने काश्मीरवरून प्रक्षोभक भाषण करताना काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस असल्याचा दावा केला होता. आता पाकिस्तानी नौदलाच्या पासिंग आऊट परेडमध्ये मुनीर यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळताना आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल असे म्हटले आहे.
यावेळी आसिम मुनीर याने काश्मीरमधील पाकिस्तानी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून होणा-या कारवायांना काश्मिरी जनतेची लढाई अशी उपमा दिली. ते म्हणाले की, भारताविरोधात लढत असलेल्या आपल्या काश्मिरी बांधवांनी दिलेल्या बलिदानाची आपण आठवण ठेवली पाहिजे. पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्मीर प्रश्नाच्या न्यायपूर्वक तोडग्याचा समर्थक आहे असा दावाही मुनीर यांनी केला.
पाकची नामुष्की
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर जबर नामुष्की ओढवली होती. मात्र या संघर्षाचा उल्लेख करताना पाकिस्ताने यादरम्यान, संयम आणि परिपक्वता दाखवली असा दावा दावाही मुनीर यांनी केला.