इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सध्या बिघडलेले आहेत. ऑक्टोबर महिन्यात दोन्ही देशांच्या सीमेवर झालेल्या चकमकीनंतर त्याचे परिणाम व्यापारावरही होताना दिसत आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार बंद आहे. याचा सर्वाधिक फटका अफगाणिस्तानला बसेल असे बोलले जात होते. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही आर्थिकदृष्टया अफगाणिस्तानचे कंबरडे मोडेल असा दावा केला होता परंतु प्रत्यक्षात याउलटच चित्र दिसत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अफगाणिस्तानसोबत व्यापार बंद केल्याने आणखी अडचणीत सापडली आहे.
एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानसोबत बिघडलेल्या व्यापार संबंधांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. पाकिस्तानी बाजारात फळे, भाज्या, पोल्ट्रीसह इतर वस्तूंच्या किंमतीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानने व्यापारासाठी नवे पर्याय शोधले, ज्यामुळे अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. अफगाणिस्तानने ११ ऑक्टोबरला पाकिस्तानी बॉर्डर ट्रेड पाँईट बंद केल्यानंतर इराण, भारत आणि मध्य आशियासोबत बाजार खुला केला आहे. त्यात व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानचे आर्थिक नुकसान होत आहे. पाकिस्तानच्या उत्पादन आणि एक्सपोर्ट सेक्टरला फटका बसला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानसोबत पुन्हा व्यापार सुरू करा अशी मागणी पाकिस्तानात होऊ लागली आहे.
अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचे ट्रेड वॉर अर्थव्यवस्थेवर त्याचा उलटा परिणाम दिसून येत असल्याचे पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने म्हटले. पाकिस्तानी इंडस्ट्रीजसाठी वस्तूंचा तुटवडा, वाढत्या किंमती आणि उत्पादनात घट निर्माण झाली आहे. हे क्षेत्र आयात आणि निर्यात दोन्हीसाठी अफगाणिस्तानसोबतच्या व्यापारावर अवलंबून आहेत. अफगाणिस्तान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. जिथे प्रतिव्यक्ती जीडीपी केवळ ४३४ डॉलर आहे. बुरुंडी आणि सोमालियासारख्या आफ्रिकन देशांपेक्षाही ही स्थिती वाईट आहे. अफगाणिस्तानातील ६४ टक्के लोकसंख्या गरिबी रेषेखाली आहे. तरीही तालिबान सरकारने भारत, इराण आणि तुर्कीसोबत व्यापार संबंध सुधारत अर्थव्यवस्थेला चालना दिली.
दरम्यान, अफगाणिस्तानसोबत व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानच्या सीमेंट इंडस्ट्रीवर परिणाम दिसत आहेत. पाकिस्तानात औषधे, शेतीचे साहित्य यांची निर्यात ठप्प झाली आहे. ही इंडस्ट्री अफगाणिस्तानसोबतच्या ट्रेडवर निर्भर होती. पाकिस्तानी कंपन्या दरवर्षी १८७ मिलियन डॉलर औषधे अफगाणिस्तानला पाठवतात. पाकिस्तानला अफगाणिस्तानातून दररोज मोठ्या प्रमाणात भाज्या, फळे येत होते. आता व्यापार थांबल्याने फळे, भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. पाकिस्तानातील अनेक शहरात टॉमेटोच्या किंमती ५०० रूपये प्रतिकिलो झाल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही देशातील व्यापार बंद होण्याचा परिणाम छोट्या व्यावसायिकांवर दिसून येतो. बॉर्डरवर काम करणारे हजारो मजूर बेरोजगार बसले आहेत. खैबर पख्तूनख्वा येथील व्यापारी सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत.

