इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सिंधू पाणी करार स्थगित केल्याबद्दल भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानी चॅनल एआरवाय न्यूजशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “जर आम्हाला वाटले की आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि पाणी देखील आमच्या सुरक्षेचा भाग आहे, तर आम्ही निश्चितपणे भारताच्या विरोधात युद्ध करू.
त्यांनी असेही म्हटले की, भारताने पाकिस्तानसाठी पाण्याची उपलब्धता वेगाने प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले, तर लष्करी कारवाईचा विचार केला जाऊ शकतो. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांच्या मृत्यूनंतर भारताने १९६० चा सिंधू पाणी करार निलंबित केला होता. भारताचे म्हणणे आहे की, पाकिस्तान सीमापार दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत हा करार पुन्हा सुरू केला जाणार नाही.
पाकिस्तानात शेतीच्या ९०% जमिनीला, म्हणजे ४.७ कोटी एकर क्षेत्रात, सिंचनासाठी पाणी सिंधू नदी प्रणालीतून मिळते. पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा २३% आहे आणि यामुळे ६८% ग्रामीण पाकिस्तानी लोकांची उपजीविका चालते. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील सामान्य लोकांबरोबरच तिथली आधीच बिकट असलेली अर्थव्यवस्था आणखी वाईट होऊ लागली आहे. पाकिस्तानमधील मंगल आणि तारबेला जलविद्युत धरणांना पाणी मिळत नाही. यामुळे पाकिस्तानच्या वीज उत्पादनात ३०% ते ५०% पर्यंत घट होऊ शकते. तसेच औद्योगिक उत्पादन आणि रोजगारावर परिणाम होईल.
















