नवी दिल्ली/तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, एका इराणी वरिष्ठ अधिका-याने खळबळजनक दावा केला आहे. जर इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब टाकला, तर पाकिस्तान इस्रायलला अणुबॉम्बने प्रत्युत्तर देईल, असा दावा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य आणि इराण रेव्होल्युशनरी गाडर््स कॉर्प्सचे वरिष्ठ कमांडर जनरल मोहसीन रेजाई यांनी केला आहे.
रेजाई यांनी हा दावा इराणी सरकारच्या वृत्तवाहिनीवर बोलताना केला. मात्र, पाकिस्तान सरकारने हा दावा तात्काळ फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी या दाव्याचा निषेध करत स्पष्ट केले की, इस्लामाबादने असा कोणताही आण्विक प्रत्युत्तराचा इराणला शब्द दिलेला नाही. आम्ही अशा प्रकारची कोणतीही आण्विक प्रतिज्ञा केलेली नाही, असे ते म्हणाले.
इराणने पाकिस्तानच्या समर्थनाचा दावा करून इस्रायलवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला असला, तरी पाकिस्तानची अधिकृत भूमिका सावध असून, आण्विक युद्धाची धमकी फेटाळण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लिम राष्ट्रांमध्ये इस्रायलविरोधात असंतोष उफाळून येत असून, त्याचा राजनैतिक आणि सुरक्षा परिणाम संपूर्ण पश्चिम आशिया भागावर पडण्याची शक्यता आहे.
इस्रायलचे अण्वस्त्र धोरण रणनैतिक अस्पष्टतेवर आधारित आहे. म्हणजेच, इस्रायलने कधीही आपल्याकडे अण्वस्त्रे आहेत हे उघड मान्य केलेले नाही, मात्र जागतिक स्तरावर इस्रायलकडे अण्वस्त्र साठा असल्याचा विश्वास आहे. त्याउलट, इराणचा अधिकृत दावा आहे की त्यांचा अणुकार्यक्रम हा पूर्णपणे शांततेसाठी, ऊर्जा निर्मिती आणि वैद्यकीय संशोधनासाठी आहे. इराण आण्विक अप्रसार करारातील सदस्य आहे आणि त्याचा अण्वस्त्रे तयार करण्याचा इरादा नाही, असे सांगितले आहे.