19.9 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeमहाराष्ट्रसर्व शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटण

सर्व शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटण

मंत्री दीपक केसरकरांची घोषणा बदलापूर प्रकरणानंतर शिक्षण विभागाला आली जाग

मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर येथील शाळकरी चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटणही बसवले जाणार आहे. यामुळे पोलिसांना त्वरित गैरप्रकाराची माहिती मिळेल, अशी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर शिक्षण विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बदलापूर घटनेनंतर संपूर्ण व्यवस्था बदलण्यास सुरुवात होईल. नुकतीच दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. दीपक केसरकर म्हणाले की, राज्यातील सर्व शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटण लावले जाणार आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आहे.

पॅनिक बटणद्वारे पोलिसांना गैरप्रकाराची त्वरित माहिती मिळेल. महिला आणि मुलं अडचणीत आल्यावर पॅनिक बटण दाबल्यास पोलिस ठाण्यात त्वरित माहिती कळते. मग ट्रॅकिंग सिस्टममुळे पोलिसांपर्यंत ही संबंधित व्यक्ती कुठे गेली हे समजते. ही सिस्टम ऑफलाईनही चालते. हैदराबादमधील एका कंपनीने हे बटण तयार केले आहे. हे सुरू केलं तर अशा घटनांवर नियंत्रण येईल.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले, बदलापूरचे प्रकरण दडपून ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्याची माहिती सरकारला दिली नाही, त्या सगळ्यांना या प्रकरणात सहआरोपी केले जाईल. याप्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. याचदरम्यान आता बदलापूर प्रकरणी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली असून या समितीच्या अहवालावर बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला महिला आयोगाच्या अध्यक्ष, बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि आयजी पोलिस विभागाला विशेष मार्गदर्शक म्हणून बोलावले आहे. याचा सविस्तर अहवाल उद्या प्राप्त होऊन बुधवारी यावर चर्चा करू, असे दीपक केसरकर म्हणाले. त्यावेळी महाराष्ट्रातील एकमेव निर्णय जाहीर करू. याबाबत मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या शाळांवर आमचे थेट नियंत्रण नाही. शाळा प्रशासनाचे एकाच विभागावर पूर्ण नियंत्रण असावे. आमच्या शाळा जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग या दोन्हीच्या नियंत्रणाखाली आहेत. सीईओच्या स्तरावर जिल्हा परिषदेच्या अधिका-यांची नियुक्ती केली जाते. शिक्षकांबाबतचे निर्णय शिक्षण विभागाला द्यावेत, असे दीपक केसरकर म्हणाले.

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR