परभणी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपी प्रल्हाद विठ्ठलराव हजारे (वय ३४) या नराधमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एम.नंदेश्वर यांनी २० वर्ष कैदेची शिक्षा ठोठावली आहे
या संदर्भात ताडकळस पोलिस ठाण्यात ०७ मार्च २०२१ रोजी पिडीत मुलीने तक्रार दाखल केली होती या तक्रारीत नमुद करण्यात आले होते की, शेजारी असणा-या शेतातील सालगडी प्रल्हाद विठ्ठलराव हजारे याने आपणास तोंड दाबून उचलून शेजारील उसाच्या शेतात नेले बळजबरी अत्याचार करीत धमकी दिली. तसेच पुढील सहा महिने संधी मिळेल त्यावेळी आपल्या मर्जीविरोधात धमकावून वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले होते’
पोटात त्रास झाल्याने तपासणी केली असता चार महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने पिडीतेने घडलेला सर्व प्रकार प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून ताडकळस पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला होता.
या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी गुन्ह्याच्या तपास केला. सरकारी पक्षाच्या वतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. याआधारे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर यांनी सोमवार, दि.१३ रोजी आरोपी प्रल्हाद हजारे यास पोक्सो कायदा कलम अन्वये २० वर्ष सश्रम कारावास, २५ हजार रुपयांचा दंड पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास सहा महिने कारावास सूनावला. तसेच कलम ५०६ नुसार तीन वर्ष सश्रम कारावास १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास तसेच अजाजप्रका अन्वये ०३ वर्ष सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने कारावासाची शिक्षा सूनावली.
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ऍड.ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी अभियोक्ता ऍड.अभिलाषा पाचपोर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, कोर्ट पैरवी अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, मीना दिवे, पुष्पा जवादे यांनी काम पाहिले.