29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeपरभणीघरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी बैठकींचा धडाका

घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी बैठकींचा धडाका

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनांतर्गत ग्रामीण भागातील गरजू, अपंग, विधवा आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी तालुका स्तरावर जाऊन ग्रामसेवक आणि संबंधित यंत्रणांच्या आढावा बैठकींचा धडाका लावला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस डेटाबेस मधील लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्यांची निश्चिती करण्याची प्रक्रिया गावस्तरावर ग्रामसेवक आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ५७ हजार ४१८ लाभार्थ्यांमधून घरकुलासाठी गरजू लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार होणार आहेत. याच अनुषंगाने शुक्रवार, दि.१४ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यांचा दौरा करून आढावा बैठकीच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामसेवक मंडळींशी संवाद साधला. आढावा बैठकीसाठी ग्रामसेवक आणि घरकुल बांधकामाशी निगडित कर्मचा-यांना गरजू, विधवा, अपंग, कुडाच्या, फाटक्या- तुटक्या अवस्थेत असलेल्या गरजवंताचा समावेश घरकुलाच्या प्राधान्यक्रम यादीत करण्याचे निर्देश यावेळी टाकसाळे यांनी दिले.

ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना १५०००० रुपयांचे अनुदान दिले जाते. सन २०२१-२२ वर्षासाठी जिल्ह्याला ७२७५ एवढे घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रमाई आवास योजना अंतर्गत परभणी जिल्ह्यात ३ हजार कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. जे लोक प्रपत्र ड च्या बाहेरचे त्यांचा या योजनेत सहभाग असणार आहे.

आढावा बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, गट विकास अधिकारी अंकुश चव्हाण, सुनीता वानखेडे, डीआरडीएचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंकुश पाठमासे, संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या