23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीझरीच्या स्मशानभूमीला देशातील पहिले आयएसओ मानांकन

झरीच्या स्मशानभूमीला देशातील पहिले आयएसओ मानांकन

एकमत ऑनलाईन

परभणी : येथून जवळच असलेल्या झरी येथील कृषीभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांनी एक गाव एक स्मशानभूमी ही लोकचळवळ उभारली आहे़ देशमुख यांनी स्वखर्चातून जमीन विकत घेवून गावातील सर्व जाती, धर्मासाठी सुंदर व सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारली आहे़ या स्मशानभूमीला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून असे मानांकन मिळवणारी झरी ही देशातील पहीली स्मशानभूमी ठरली आहे़.

आजही अनेक गावात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नाही़ तसेच ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत़ ग्रामिण भागात तर स्मशानभुमीचीअत्यंत वाईट अवस्था आहे़ अनेक ठिकाणी तर स्मशानभुमीच्या जागेवरून वाद होण्याच्या देखील घटना घडतात़ .

तर अनेक ठिकाणी जातीनुसार स्वतंत्र स्मशानभूमी आहेत़ परंतू मरणा नंतरचा सोहळा चांगल्या वातावरणात पार पडला पाहिजे हा विचार घेवून कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांनी एक गाव एक स्मशानभूमी ही लोकचळवळ उभारली आहे़ ही संकल्पना प्रत्याक्षात साकार करण्यासाठी त्यांनी झरी येथे एक एकर जमिन विकत घेतली़ त्यानंतर आईच्या नावाने स्व़मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम ही स्मशानभुमी सर्व जाती, धर्माच्या लोकांसाठी तयार केली़ गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांनी स्मशानभुमीचा कायापालट केला आहे़.

या ठिकाणी एक एकरात विविध वृक्षांची लागवड केली आहे़ तसेच या ठिकाणी येणा-या नागरीकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली आहे़ तसेच पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध करून दिले आहे़ त्याचबरोबर २४ तास वीज, रात्रीच्या वेळी दिव्यांची व्यवस्था केली आहे़ तसेच या ठिकाणी येणा-या नागरीकांना सामाजिक संदेश देण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, कन्यारत्न जन्माचे स्वागत, शेतकरी आहे अन्नदाता अशा म्हणी लिहीत विविध शासकीय योजनांचे फलक लावण्यात आल आहेत.

त्यामुळे स्मशानभुमीतील वातावरण प्रसन्न दिसून येते़ जिल्ह्यातील सर्व स्मशानभुमी याच पध्दतीने स्वच्छ व सुंदर झाल्या पाहीजेत यासाठी त्यांनी संकल्प केला आहे़ त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक स्मशानभुमी चळवळ जिल्ह्यात रूजत आहे़ झरी येथील स्मशानभुमीचा आदर्श इतर गावचे ग्रामस्थही घेवू लागले आहेत.

या ठिकाणी भेट देण्यासाठी परीसरातील अनेक गावचे नागरीक येत असतात़ याच गोष्टीची दखल घेवून आयएसओ मानांकन संस्थेने दखल घेतली़ नुकतीच या संस्थेच्या सदस्यांनी इथल्या भौतिक सुविधांसह उपलब्ध सुविधांची पाहणी करून स्मशानभुमीला आयएसओ मानांकन दिले आहे़ अशा प्रकारचे मानांकन मिळवणारी झरी स्मशानभुमी देशातील पहिली आयएसओ मानांकनप्राप्त स्मशानभुमी ठरली आहे़ ही बाब परभणीकरांसाठी भुषणावह ठरली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या