जिंतूर : शहरापासून 03 कि.मी.च्या अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर खड्डा चुकविण्याचा नादात दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात दोन सख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय हेलवणारी घटना सोमवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. मयत तिन्ही भावंडे मालेगाव येथील रहिवासी असल्यामुळे समस्त ग्रामस्थांवर शोककळा पसरली होती.
अपघाताविषयी सविस्तर वृत्त असे की, जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला 18 वर्षीय अभिषेक काशीनाथ म्हेत्रे हा आपल्या 15 वर्षीय योगेश या सख्या भावाला शहरातील जवाहर विद्यालयात सोडण्याकरिता व 20 वर्षीय रामप्रसाद विश्वनाथ या चुलत भावाला कामावर सोडण्यासाठी दुचाकी क्र.एम.एच.26 ऐव्हि 2834 वर जिंतूरकडे निघाला होता. अकोली शिवारातील पुलाजवळ खड्डा चुकविण्याचा नादात समोरून भरधाव वेगाने येणा-या ट्रक क्र.एम.एच.18 बि.जी.6270 वर दुचाकी आदळली. या अपघातात ट्रकने दुचाकीवरील तिघांना चेंगरत नेले. सदरील भीषण अपघातात दोन सख्या भावंडांसह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने, पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सपोनि गायकवाड, पो.कॉ गायकवाड,वाहन चालक सासने आदींच्या पथकाने मालेगाव ग्रामस्थ पांडुरंग मुसळे, तुकाराम थिटे, ज्ञानेश्वर पांचाळ, सामाजिक कार्यकर्ता नागेश आकात,बालाजी शिंदे सोसकर व रुग्णवाहिका चालक अरूण घुगे यांच्या मदतीने मयताचे शव शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणात मयताचे चुलत भाऊ प्रविण म्हैञे याच्या फियार्दीवरून ट्रक चालक चंदुलाल पाटील रा.जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास जिंतूरचे सपोनि गंगाधर गायकवड हे करत आहे.