परभणी : जिल्ह्यातील दामपुरी शिवारात दोन दिवसात तडफडून २० मेढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने मेंढपाळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे दोन दिवसांत मेंढपाळ विठ्ठल बोबडे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
दामपुरी शिवारात १० ते १२ मेंढपाळ वेगवेगळ्या कळपाने अनेक वर्षापासून मेंढ्या सांभाळतात. त्यातील विठ्ठलराव बोबडे यांच्या मेंढ्या शिवारात थांबल्या असताना अचानक गुरूवारी रात्री काही मेंढ्या ओरडत, पाय खोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाहता पाहता रात्रीत ८ ते १० मेंढ्यांचा मृत्यू झाला. दुस-या दिवशी परभणी येथील पशुवैद्यकीय अधिका-यांना ही माहिती कळविण्यात आली. दुस-या रात्रीही परत काही मेंढ्या अशाच चक्कर येऊन पडू लागल्या. यात शनिवारी सकाळी आणखी १० मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या.
घटनास्थळावरूनच नागरीकांनी पशुधन विकास अधिकारी डॉ.आघाव यांच्याशी संवाद साधत मेंढपाळांच्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या. मेंढ्यांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी लवकरच एक पथक नेमत उपचार करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान एका पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत मेंढ्याच्या शरीराचे काही भाग तपासणीसाठी पुणे येथे प्रयोग शाळेला पाठवण्यात आल्याची माहिती दिली. हा रिपोर्ट आल्यानंतरच याचे कारण लक्षात येणार आहे. एकूणच २ दिवसात सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याने मेंढपाळ विठ्ठल बोबडे व त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे. या मेंढपाळांना शासनाकडून वैद्यकीय मदत व नुकसानीबद्दल आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.