कौसडी : बोरी येथील सरकारी दवाखान्याच्या समोरील गल्लीमध्ये गजानन बोधले किराणा दुकानातून २ लाख रुपयांचा गुटखा दि. १८ सप्टेंबर रोजी पकडण्यात आला. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी बोधले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबात मिळालेली माहिती अशी की, बोरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सावंत, शहाणे, कंठाळे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोधले यांच्या किराणा दुकानात छापा मारून माणिकचंद, गोवा, विमल आदी कंपनीचा गुटखा साठा जप्त करून बोरी पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २ लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणी बोधले यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेचा तपास बोरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर या करीत आहेत.