परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वी परीक्षेचा निकाल गुरूवार, दि.२५ मे रोजी जाहीर करण्यात आला. यात परभणी जिल्ह्याचा ८७.९२ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील ११२२३ मुले तर ९३९५ मुली पास झाल्या आहेत. यात मुलांच्या निकालाची टक्केवारी ८४.९१ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९१.८१ टक्के असून सावित्रीच्या लेकींनी निकालात बाजी मारली आहे.
जिल्ह्यात गंगाखेड तालुक्याने निकालात प्रथम क्रमांक पटकावला असून या तालुक्याची निकालाची टक्केवारी ९२.६७ टक्के आहे. मानवत तालुक्याचा निकाल सर्वात निचांकी असून निकालाची टक्केवारी ८३.८७ टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी, मार्च मध्ये घेण्यात आलेल्या १२वी परीक्षेसाठी जिल्ह्यातील २४१५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. यातील २३४४९ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यातील ११२२३ मुले व ९३९५ मुली असे २०६१८ मुले उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८७.९२ टक्के आहे.
यात विज्ञान शाखेचा निकाल ९४.९५, कला शाखा ७९.२५, वाणिज्य शाखा ९१.३६, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा ८८.३५ तर टेक्निकल सायन्स शाखेचा निकाल ८३.४२ टक्के लागला आहे. यात डिस्टींक्शनमध्ये १७४५, प्रथम श्रेणीत ७५५९, द्वितीय श्रेणीत ९१०८ तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२०२ एवढी आहे.
जिल्ह्यातील निकालात गंगाखेड तालुक्याने बाजी मारली असून मानवत तालुका सर्वात निचांकीस्थानी आहे. यात गुणानुक्रमे गंगाखेड तालुका ९२.६७ टक्के, सोनपेठ तालुका ९१.५० टक्के, जिंतूर तालुका ९०.४७ टक्के, सेलू तालुका ८९.५७ टक्के, पालम तालुका ८८.७७ टक्के, परभणी तालुका ८६.०८ टक्के, पाथरी तालुका ८५.३४ टक्के, पूर्णा तालुका ८५ टक्के तर मानवत तालुका ८३.८७ टक्के निकाल लागला आहे.