26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeपरभणीमानवतरोड रेल्वेस्थानक सापडले अस्वच्छतेच्या विळख्यात

मानवतरोड रेल्वेस्थानक सापडले अस्वच्छतेच्या विळख्यात

एकमत ऑनलाईन

मानवत/प्रतिनिधी
पाथरी, मानवत या दोन तालुक्यासाठी एकमेव असलेले मानवतरोड रेल्वेस्थानक लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक बनवण्यात आले. परंतू सध्या या रेल्वे स्थानकाची अवस्था अंधेरनगरी अशी झाली आहे. या स्थानकावर दिवे नसून सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. विश्राम गृहातील शौचालय कुलूपबंद असून सार्वजनिक शौचालय सतत बंद ठेवल्याने त्यात काटेरी झुडपे वाढली असल्याचे पहावयास मिळत आहे. सार्वजनिक स्थानकाला समस्यांचा विळखा पडला असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत. याकडे रेल्वेच्या वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतून जोर धरीत आहे.

मनमाड ते काचीगुडा रेल्वे मार्गावरील मानवत व पाथरी या दोन तालुक्यासाठी असलेल्या मानवतरोड या रेल्वे स्थानकांमध्ये सोयीसुविधा देण्यात आल्या होत्या. परंतू स्थानकाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने समस्यांचे प्रमाण वाढत आहे. रेल्वे स्थानकात पुरेशा देखभाली अभावी अक्षरश: सुविधांची दुर्दशा झाली आहे. या स्थानकांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाची जवाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र वरिष्ठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या स्थानकांवर प्रवाशांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. याच मुळे रेल्वे स्थानक बहुतांश वेळा अंधारात राहते. इतकेच नव्हे तर स्थानकातील जागोजागी निखळलेले प्लॅस्टर, खराब झालेले अग्निशमन यंत्रणेचे बॉक्स, पाण्याची टंचाई, तुटलेल्या टाईल्स असे भेसूर चित्र दिसते. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवरून दररोज रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी पसरली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी असलेल्या मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांसाठीचे विश्राम गृहातील प्रसाधन गृह हे कुलूपबंद ठेवले जाते तर सार्वजनिक प्रसाधन गृहाचे हाल न बघण्यासारखे आहेत. त्याची जागोजागी तूट फूट झालेली आहे. सतत ते बंद ठेवल्याने त्यात काटेरी झुडुपे आल्याचे दिसत आहे. या ठिकाणी शौचालय असो की परिसर स्वच्छतेचा निव्वळ देखावा करण्यात येतो. वास्तविक पाहता या ठिकाणी स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असताना रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी रेल्वे प्रवाशी वर्गातून होताना दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या