परभणी/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरील हल्ल्याचा परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवार, दि.०९ एप्रिल रोजी जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदवण्यात आला. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचा-यांनी हल्ला केला. बंगल्याचे प्रवेशद्वार तोडून हे आंदोलक आत घुसले. या आंदोलनकर्त्यांनी निवासस्थानावर चपला व दगड भिरकावले. या घटनेचा परभणी शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याचे मास्टरमांईंड शोधून संबंधितांना कठोर शासन करावे अशी मागणी राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह पदाधिका-यांनी जिल्हा प्रशासन दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचा-यांनी गेल्या पाच महिन्यापासून विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. मात्र, ०८ एप्रिल रोजी त्यातील काही कर्मचा-यांनी श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या निवासस्थावर जावून घोषणाबाजी करत दगड भिरकावले. पवार यांच्या घरावर झालेला हा भ्याड हल्ला निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणार नाही. या हल्ल्यातील दोषी आरोपींचा शोघ घेवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, नंदाताई राठोड यांच्यासह वरीष्ठ पदाधिकारी, महापालिका सदस्य सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.