परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता काल आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह आ.तानाजी मुटकुळे यांनी अर्ज दाखल केले होते. त्या पाठोपाठ आज आ. सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, आमदार मेघना बोर्डीकर, बँकेचे संचालक अॅड.स्वराजसिंह परिहार, उपमहापौर भगवानराव वाघमारे, राजेश विटेकर, विद्यमान संचालक विजय जामकर, सौ.रूपाली राजेश पाटील गोरेगावकर यांनी गुरुवारी (दि.18) उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान २९ इच्छुकांचे ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या शेतकी भवनात भाजपच्या आमदार सौ.मेघना बोर्डीकर यांनी गुरूवारी सकाळी समर्थकांसह अर्ज दाखल केला. दुपारी तीन वाजता आमदार वरपुडकर, माजी आमदार देशमुख, अॅड.परिहार व उपमहापौर वाघमारे यांनी आपले अर्ज दाखल केले. यावेळी सुशील देशमुख, गुलमीर खान, सचिन अंबिलवादे, नदीम इनामदार, संतोष बोबडे पाटील, श्रीधरराव देशमुख, बाळासाहेब फुलारी, सेलुचे मिलींद सावंत, अॅड.सिध्दार्थ भालेराव, शुभम जाधव, पंजाबराव देशमुख, सुमीत परिहार आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या स्नूषा सौ. रूपाली गोरेगावकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान आज अर्ज दाखल केलेल्यात मेघना बोर्डीकर यांनी दोन, सुरेश वडगावकर यांनी दोन, भगवान सानप यांनी तीन, यशश्री सानप यांनी दोन, रूपाली पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकूण 29 इच्छुकांचे 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.