27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात लंपी स्किन आजाराची ४३ जनावरे आढळली

परभणी जिल्ह्यात लंपी स्किन आजाराची ४३ जनावरे आढळली

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हयातील ८४९ गावांपैकी १० गावात दि.१६ सप्टेंबरअखेर लंपी स्किन आजाराचे ४३ जनावरे आढळून आली असून वेळीच उपचारामुळे यापैकी २२ जनावरे बरी झालेली आहेत आणि २१ जनावरांवर उपचार चालु आहेत. बाधित क्षेत्रातील २० हजार ७३७ जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलेले आहे. जिल्हयात या आजाराने कुठल्याही जनावराचा मृत्यु झालेला नाही. यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या जनावरांवर वेळीच उपचार करुन घेण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

लम्पी चर्म रोगाबाबत जिल्हास्तरावर केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी गोयल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पी.पी.नेमाडे, सहायक आयुक्त डॉ.आर.ए.कल्ल्यापुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल यांनी पुढे बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यातील जवळपास २१ जिल्हयांत जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले असून परभणी जिल्ह्यातील १० गावात या रोगाचे जनावरे आढळून आल्याने प्रशासनाने वेळीच उपाय योजना करुन तेथील रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणला आहे. तथापि या रोगाचा प्रादुर्भाव प्रसार जिल्हयात इतरत्र होवु नये याची काळजी पशुपालकांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या रोगाची लक्षणे, उपचार प्रतिबंधक उपाय आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या जनावरांवर वेळीच उपचार करुन घेण्यात यावेत़ रोगाचा प्रसार टाळण्यासाठी बाधित जनावर इतर जनावरांपासुन तात्काळ वेगळे करुन बाधीत जनावर किंवा बाधीत चारा- पाणी व इतर साहित्याची वाहतुक होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठयाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण फवारणी करून डास, माशा, गोचिडांचा बंदोबस्त करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी केले.

जिल्हयात या रोगाचा प्रसार होवु नये म्हणुन प्रशासनातर्फे संपुर्ण उपाययोजना करण्यात येत आहे. शासनाच्या सुचने प्रमाणे जिल्हयातील गोशाळेमधील गोवर्गीय ०३ हजार २३५ जनावरांना लसीकरण करण्यांत आलेले आहे. प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये शासनाने या रोगाबाबत संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र घोषित केले असुन जनावरांची नियंत्रित क्षेत्रात व बाहेर ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. आजारग्रस्त जिवंत किंवा मृत जनावरे, त्यांच्या संपकार्तील वैरण व अन्य साहित्याच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जनावरांचे बाजार, शर्यती, जत्रा व प्रदर्शन भरविण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच लंंपी स्किन डिसीज रोग प्रादुभार्वाची माहिती पशुपालक इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्राम पंचायत यांनी तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय संस्थेस, प्रशासनास देणे बंधनकारक केले आहे.

तज्ञ समितीने शिफारस केल्याप्रमाणे या रोगाच्या औषधोपचाराची कार्यप्रणाली पशुसंवर्धन विभागामार्फत अंमलात येत आहे. बाधीत क्षेत्रातील नजीकच्या पशुवैद्यकिय संस्थेवर या रोगाचे लसीकरण व औषधोपचार मोफतरित्या केले जात आहेत. हा रोग शेळ्या – मेंढयांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मानवास होणारा हा रोग नसल्याने गाई- म्हशींचे दुध अत्यंत सुरक्षित आहे. तेव्हा जनतेने व पशुपालकांनी घाबरुन जावु नये. फक्त रोगाची लक्षणे दिसुन येताच पशुसंवर्धन विभागास तात्काळ सुचना करून वेळीच मोफत लसीकरण व मोफत उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या