परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवे ७० रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने शाळा, आठवडी बाजार, मोर्चे, रास्तारोको तसेच विदर्भात जाणा-या प्रवाशी वाहतूकीस बंदी केली आहे. यानंतरही सातत्याने गेल्या आठवडाभरापासून रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी (दि. 27) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आलेल्या अहवालात 70 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत.
तर ८५ व्यक्तींना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयातील कक्षात 222 रुग्ण उपचार घेत आहेत. दुर्देवाने आजपर्यंत 324 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 8 हजार 518 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 7 हजार 972 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 25 हजार 361 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 16 हजार 285 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 8 हजार 362 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 574 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले आहेत.
दरम्यान परभणी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २८ रोजी पर्यंत जिल्हा प्रशासनाने शाळा, धार्मिकस्थळे, आठवडी बाजार, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यात जाणा-या खासगी व सार्वजनिक वाहतुकीस बंदी घातली होती. त्यात आता वाढ करण्यात आली असून ही बंदी ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.