परभणी : पूर्णा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता संतोष गंगाराम गुंजिटे याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गुरुवारी (दि. २) दोन हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले.
पूर्णा तालुक्यातील तक्रारकर्त्याने भावाच्या शेतात सौरउर्जा पंप मंजूर झाल्याने पूर्णा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून शेतात विद्युत जोडणी नसल्याचे प्रमाणपत्र मागितले. तेव्हा संबंधित अभियंत्याने ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. गुरुवारी तडजोडीअंती २ हजार रुपये घेवून ये असे म्हटले. त्यानुसार तक्रार दाखल झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून संतोष गुंजिटे याला लाच घेताना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे व अपर पोलिस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक बसवेश्वर जक्कीकोरे, पोलिस हवालदार निलपत्रेवार, पोलिस नाईक कटारे, पोलिस शिपाई कदम आदींनी केली.