जिंतूर : तालुक्यातील ईटोली येथे आठवडी बाजारासाठी जाणा-या टेम्पोच्या टपावरून खाली पडल्यानंतर टेम्पो अंगावरून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घेवंडा येथे घडली आहे.
या प्रकरणी घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ग्रामीण भागात आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला व किराणा समान विक्रीसाठी शेतकरी जात असतात. नेहमीप्रमाणे इटोली येथे भाजीपाला व इतर साहित्य घेऊन सर्व व्यापारी टेम्पो क्र.एमएच २२- २१११ने जात होते. भाजीपाला घेऊन जाणारे शहरातील लहुजी नगर येथील गजानन घुले(३५) टेम्पोच्या टपावर बसून जात असताना घेवंडा पाटीजवळ अचानक तोल गेल्यामुळे ते खाली पडले. ते खाली पडल्यावर टेम्पो अंगावरून गेलाÞ यावेळी सोबतच्या सहका-यांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पंचनामा केला. मृताच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.