परभणी : सोनपेठ येथे कै.विलासराव देशमुख अर्बन निधी बँकेच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी शेळगाव (ता. सोनपेठ) येथील पुरातन काळातील महाविष्णू देवस्थानाला भेट देवून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अवकाळी पाऊस व शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांसमोरील सर्व संकटे टळावीत, असे साकडे घातले.
सोनपेठ येथे सुरू करण्यात आलेल्या कै. विलासराव देशमुख निधी अर्बन बँकेचे उद्घाटन शनिवारी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आमदार देशमुख यांनी शेळगाव महाविष्णू येथील पुरातन काळातील महाविष्णू देवस्थानला भेट देवून दर्शन घेतले. यावेळी आमदार देशमुख यांनी अवकाळी पाऊस व शेतमालाच्या कोळलेल्या दरामुळे शेतक-यांपुढे संकटे निर्माण झाली असून या संकटातून शेतक-यांची सुटका करावी अशी साकडे भगवान महाविष्णूला घातले. तसेच यावेळी उपस्थित नागरीकांकडून मंदिराच्या प्राचिनतेबद्दल माहिती घेतली.
यावेळी अनपेक्षितपणे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत व त्यांचा जाहीर सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना आमदार देशमुख यांनी ग्रामस्थांनी आजवर जे प्रेम माजी मुख्यमंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि सहकारमहर्षी तथा माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांना दिले तेच प्रेम आज ग्रामस्थांनी माझ्या बद्दल व्यक्त केले आहे. शेळगाव ग्रामस्थाचे देशमुख कुटुंबावर असलेल्या प्रेमामुळेच आपण गावास मुद्दाम भेट देण्यासाठी आलो आहोत. शेळगाव ग्रामस्थांचे हे प्रेम कायम लक्षात राहण्यासारखे असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी आवर्जुन नमुद केले.