Thursday, September 28, 2023

चोर समजून मारहाण, एकाचा मृत्यू २ गंभीर जखमी

ताडकळस : ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद परिसरातील उखळद-नवागड मार्गावरील ईदगाह वळनावर शनिवार, दि.२७ मे रोजी मध्यरात्री तीन युवकांना चोर समजून दोरखंडाने बांधून लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहान करण्यात आली. यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जवळील बलसा खुर्द येथील तिघे जण शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास डुकराची शिकार करण्यासाठी उखळद या ठिकाणी गेले होते. गावातील काही जणांना ते तिघे चोरी करण्यासाठी आले असल्याचा संशय आला. त्यामुळे उखळद गावातून नवागडकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर गावातील काही लोकांनी संबंधितांना जबर मारहाण केली.

या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या किरपालसिंग सुरजित सिंग भौंड यांचा मृत्यू झाला असून अरुणसिंग जोगीदसिंग टाक, गोरासिंग उर्फ सचिनसिंग गुरुबच्चनसिंग दुधाणी हे दोघे परभणी येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत गोरासिंग गुरुबच्चन सिंग दुधानी (रा.साखला प्लॉट परभणी) यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ०५ अनोळखी आरोपी व इतरांवर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास ताडकळस पोलिस ठाण्याचे ठाणेदार कपिल शेळके हे करीत आहेत. या घटनेची माहिती कळताच पोलिस ठाण्याचे ठाणेदार कपिल शेळके, रामकिशन काळे, संभाजी शिंदे, संतोष चाटे, गणेश चनखोरे, भारत तावरे, राजकुमार सुरनर आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींची मदत केली. दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि कपिल शेळके आदींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या