परभणी : शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसंग्राम, रिपाई (आठवले गट), रयतक्रांती व महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार प्रा.किरण नारायणराव पाटील यांना पसंती क्रमांक १ चे मतदान देऊन विधान परिषदेत पाठवावे असे आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी शिक्षकांना केली.
प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भरोसे व भाजप पदाधिकारी परभणी विधानसभा मतदार संघातील शाळेत जाऊन शिक्षक बांधव, भगिंनी यांच्याशी संवाद साधत शिक्षकांचे प्रश्न समजून घेत आहेत. भारतीय जनता पार्टी ही वचन नाम्याला कटिबद्ध राहणारा पक्ष आहे़ केंद्रात व राज्यात डबल इंजीन सरकार असल्याने राज्यातील शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न हे भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षच सोडवू शकतो.
प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना, आश्वासित पदोन्नती प्रश्न, प्रचलित अनुदान, जि.प.शिक्षक पदोन्नती दि.२८ डिसेंबर २०२२चा शासन निर्णय रद्द करणे़ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न तसेच लिपीक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती पूर्वी प्रमाणे सुरु करण्यात यावी़ याच प्रमाणे वचननाम्यातील इतर प्रश्नांची पुर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असणार आहेत़ त्यामुळे सर्व शिक्षकांनी यावेळेस शिक्षक मतदार संघात बदल घडवून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे प्रा.पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी शिक्षक बांधवांना केले आहे.
परभणी शहरातील हरिप्रसाद मंगल कार्यालयात रविवार, दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. महायुतीचे उमेदवार प्रा.किरण पाटील, आ.मेघना बोर्डीकर व जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन लक्ष्मीकांत क्षीरसागर, समाधान पवार व श्रीधर कोके यांनी केले आहे.