30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeपरभणीबोरी बसस्थानकासमोरील पाच दुकाने जळून खाक

बोरी बसस्थानकासमोरील पाच दुकाने जळून खाक

एकमत ऑनलाईन

बोरी : येथील बस स्थानक समोरील पाच दुकानांना दि. १० एप्रिलच्या पहाटे आग लागली. या आगीत व्यापा-यांचे 18 लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. जिंतूरच्या अग्निशामक दलास येण्यास मोठा विलंब झाल्याने नागरिकांमधून मात्र संताप व्यक्त केला जात होता.

बोरी येथील बसस्थानका समोरील जिंतूर रोडवर पोलीस पाटील शिवाजीराव चौधरी यांच्या जागेत व्यापा-यांची दुकाने आहेत. यातील मुजा गंगाधरराव मोरे यांचे साईराज मशिनरी स्टोअर्स, संजय गोविंदराव कंठाळे यांचे कलाश्री जेंट्स पार्लर, संतोष रामराव गायकवाड यांचे पार्थ प्रिंटिंग, बालाजी अण्णाजी भुसारे यांचे बालाजी हेअर सलून व संतोष फुलचंद लांडगे यांचे जैन टी हाउस या दुकानांना शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. नागरिकांना व व्यापा-यांना आग लागल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

कर्तव्यावर असलेले जमादार चौधरी व कर्मचारी शेख यांनी जिंतूरच्या अग्निशामक दलास भ्रमणध्वनीच्या विविध क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु काही भ्रमणध्वनी बंद होते तर काहींची फक्त बेल जात होती, असे प्रत्यक्ष उपस्थित नागरिकांनी सांगितले. यानंतर उशिरा संपर्क झाल्यानंतर अग्निशामक दल, गावातील नागरिक व व्यापा-यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यामुळे इतर दुकानांचे नुकसान टाळले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून महसूल विभागाचे एस.जी. होळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

आग लागलेल्या दुकानातील विविध प्रकारचे सर्व साहित्य व दुकाने जळाल्याने या व्यापा-यांची जवळपास १८ लाखांचे नुकसान झाले. कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना व्यापा-यांना या भीषण समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. राजकीय पुढा-यांनी व अधिका-यांनी या व्यापा-यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.

थोडी तरी लाज बाळगा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या