सोनपेठ : मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ पोलिसांना चकवा देत चोरट्यांनी चोरी करण्याचा धुमाकूळ घातला होता. सोनपेठचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या चोरट्यांनी सोनपेठ शहरात दोन दुकाने फोडल्याची कबुली दिली.
सोनपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी २५ जून रोजी शहरात घरफोडयांच्या अनुषंगाने गावात गोपनीयरीत्या पेट्रोलिंग करीत असताना काही इसम संशयितरित्या हालचाली करत असल्याचे दिसून आले होते.
त्यांच्यावर बराच वेळ बारकाईने लक्ष ठेवले असता साधारण रात्री अकरा वाजता त्यांना पकडण्यासाठी झडप घातली़ यावेळी तिघांपैकी शंकर भीमा काळे वय २५, बाबा बापू काळे दोघेही रा.बनसारोळा ता.केज जि.बीड यास पकडले. यावेळी बाबू बन्सी काळे पळून जाण्यात यशस्वी झाला.
पकडलेल्या दोघांना सोनपेठ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीनावर सोडले. त्यानंतर सोनपेठ पोलिसांच्या वतीने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्यानंतर दि. ३० जुन रोजी परत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोनपेठ येथे व्यंकटेश्वरा कृषी सेवा केंद्र व शिवप्रसाद तापडिया यांचे किराणा दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
सद्यस्थितीत ते सोनपेठ येथे पोलिस कोठडीत असून त्यांनी सोनपेठसह पाथरी, परभणी, परळी या ठिकाणी घरफोडी आणि चोरी केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही गुन्ह्यातील तपास दरम्यान फरार आरोपी बाबू बन्सी काळे यांचा शोध पोलिसांच्या वतीने घेण्यात येत असून तपास पूर्ण झाल्यावर त्यांचा ताबा परभणी व परळी पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती सपोनी बोरकर यांनी दिली.
सदरची कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी, पोलिस उपनिरीक्षक मंचक फड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी, हेड कान्स्टेबल वंजारे, पोलिस नाईक लांडगे यांनी केली आहे.