पालम : येथील तलावाच्या काठावर खेळत असताना पाय घसरून एक आठ वर्षांचा बालक तलावात पडला. या बालकास पोहणा-या काही लोकांनी तलावातून बाहेर काढून रूग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही दुर्देवी घटना दि. १४ डिसेंबर रोजी घडली.
शेख रफीक शेख खाजा रा. बरकत नगर गंगाखेड यांची पत्नी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पालम येथे त्यांचे वडील शेख शादुल शेख इस्माईल यांच्याकडे मागील दहा दिवसापुर्वी आली होती. सदरील महिलेचा शेख अरसलान शेख रफीक हा आठ वर्षाचा मुलगा सकाळी दहाच्या दरम्यान तलावाच्या काठावर खेळत असताना पाय घसरुन तलावात पडला.
सदरील घटनेची माहिती पालम पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे, सपोनि. मारोती कारावार यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक पोहणा-या तरुणांच्या मदतीने तलावात शोधकार्य केल्यानंतर अर्ध्या तासानंतर बालक सापडले. बालकास पाण्याच्यावर काढून तात्काळ ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बालकास मृत घोषित केले. यानंतर बालकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाकांच्या स्वाधीन केला. घटनेचा पुढील तपास बीट जमादार पाटील करत आहेत. या दुर्देवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.