19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeपरभणीमानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना समुपदेशन, योग्य उपचारांची गरज : डॉ.हमीद दाभोलकर

मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना समुपदेशन, योग्य उपचारांची गरज : डॉ.हमीद दाभोलकर

एकमत ऑनलाईन

परभणी : ग्रामिण भागातील नागरिकांवर आजही मोठ्या प्रमाणावर करणी, भानामती, अंगात येणे आदींसारख्या गोष्टीचा पगडा असल्याचे दिसून येते़ मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक नागरिकांचे करणी, भानामती झाल्याच्या नावाखाली भोंदुबाबांकडून आर्थिक शोषण केले जाते. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना समुपदेशन व योग्य ते उपचार करून यातून त्यांची सुटका करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती राज्य कार्यकारी समिती सदस्य तथा प्रसिध्द मनोविकार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती व मन हॉस्पिटल परभणी मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र द्वारा आयोजित करणी- भानामती, अंगात येणे इत्यादी संबंधीत मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्राचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि़१६ डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ़हमीद दाभोलकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती राज्य कार्यकारी समिती सदस्य श्रीमती नंदिनी जाधव यांच्यासह कृषीभुषण कांतराव काका देशमुख, महिला व बाल कल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, अंनिसचे परभणी अध्यक्ष डॉ. रविंद्र मानवतकर, अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी परभणीचे अध्यक्ष डॉ़रामेश्वर नाईक, मन हॉस्पिटलचे प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. जगदीश नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ़दाभोलकर म्हणाले की, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर करणी, भानामती, अंगात येणे आदी प्रकार दिसून येतात़ तसेच मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या नागरीकांवर इतर ठिकाणच्या तुलनेत मराठवाड्यात फारच कमी प्रमाणात उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत़ हा अभाव भरून काढण्याचा प्रयत्न आज उद्घाटन झालेल्या करणी-भानामती, अंगात येणे इत्यादी संबंधीत मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे़ हे केंद्र स्थापन करण्यासाठी डॉ़. रविंद्र मानवतकर व डॉ. जगदिश नाईक यांनी घेतलेला पुढाकार खरच कौतुकास्पद आहे़ या केंद्राच्या माध्यमातून मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचे समुपदेशन व योग्य ते उपचार करून भोंदू बाबांकडून आर्थिक व मानसिक शोषण थांबवण्यास मदत होईल. तसेच या केंद्राद्वारे ग्रामिण भागात मानसिक आजाराबद्दल जनजागृती केली जाईल असे मत डॉ़दाभोलकर यांनी व्यक्त केले.

यावेळी श्रीमती नंदिनी जाधव यांनी जट निर्मुलनाच्या कार्याची माहिती दिली़
प्रास्ताविक डॉ. सुनिल जाधव यांनी केले़ आभार व्यक्त करताना मानसोपचार तज्ञ डॉ़जगदिश नाईक यांनी मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्यासाठी शिबिरे घेण्यात येतात़ तसेच मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णासह त्याच्या पालक, नातेवाईकांचे देखील समुपदेशन करण्यात येते़ भविष्यात अंनिसच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरासह ग्रामिण भागात मानसिक आजारांबद्दल जनजागृती करण्यात येणार असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ़जगदीश नाईक यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या