परभणी : मानवी जीवनामध्ये होणारी प्रत्येक कृती ही ज्ञानाच्या अधिष्ठानावर असावी. कोणतीही उपासना ही डोळस असली पाहिजे. कर्म आंधळे असून चालत नाही. कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे पाहिजेत. गीता म्हणजे एका अर्थाने श्रुतीच आहे. कर्म, ज्ञान, उपासना या तीन्हीचाही समन्वय आवश्यक आहे. या तीन्ही शिवाय जीवन अशक्य आहे, असे हभप श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
येथील चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने वैष्णवी मंगल कार्यालयात गुरूवार, दि.१९ पासून श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर) यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भगवतगीता भावदर्शन या विषयावरील प्रवचन मालेस प्रारंभ झाला. प्रतिवर्षाच्या या प्रवचनमालेत श्रीमद् भगवत गीतेच्या प्रत्येक आध्यायावर विवेचन होत आले आहे. यावर्षी गीतेच्या कर्मसंन्यास योग या पाचव्या अध्यायावर हभप चैतन्य महाराज यांनी विवेचनास प्रारंभ केला.
यावेळी गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांनी मानवी जीवनात कर्म आगतिकतेनेच स्विकारावे लागते असे स्पष्ट केले. गीता ही त्रिकांडात्मक असून कर्म, ज्ञान आणि उपासना हे भगवतगीतेचे प्रतीपादन आहे. मानवी जीवनातील या तीन्हींचा समन्वय अद्वैत तत्वज्ञानाने वर्णन केले आहे. या त्रिकांडाच्या समन्वयाशिवाय मानवी जीवनात सुख, समाधान नाही. म्हणून ज्या कृतीतून पाप किंवा पुण्य निर्माण होते त्यालाच कर्म म्हणतात. ते कर्म प्रत्येक मनुष्याला जीवनात आगतिकतेने स्विकारावे लागते, असे ते म्हणाले.
कर्म, ज्ञान व उपासनेशिवाय मानवाला मोक्ष नाही. भगवंताने, वेदाने याची विशिष्ट मांडणी केलेली आहे. गीतेच्या पाचव्या अध्यायामध्येच सर्व कर्मयोग सांगितलेला आहे, असे ते म्हणाले. आपल्या बुध्दीवर परमार्थ होत नाही, तर प्रपंच होतो. ज्याचा त्याग करायचा आहे, त्याची प्रशंसा नसते. विचारी मनुष्य हा श्रेयाची भाषा वापरतो. भगवंताच्या प्राप्ती इतकं सोपं काहीच नाही, फक्त संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेलो तर परमात्म्याची प्राप्ती होते, असे नमूद केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्राम परळीकर व त्यांच्या संचाने अभंग सादर केला. यावेळी चैतन्य प्रतिष्ठानचे दिवंगत सदस्य भालचंद्र लंगर, शरदचंद्र लव्हेकर, कृष्णा मोहरीर, अनंतराव देशमुख यांच्याप्रति श्रध्दांजली अर्पण कण्यात आली. आनंद देशमुख व रमाकांत लिंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर शंकर आजेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता सौ.अपर्णा परळीकर यांच्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता त्रिंबकराव सुगावकर, विजय सराफ, वि.म.औंढेकर, प्रभाकर देशमुख, तानाजीराव दळवी, किशनराव चोपडे, दिगंबरराव मोहिते, विजय कुलकर्णी, श्रीकांत देशमुख, वसंत चौधरी, दिगंबरराव कुलकर्णी, शिवाजीराव वांगे, सुहास बीडकर, विजय जोशी आदी परिश्रम घेत आहेत. या प्रवचनमालेस मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.