ताडकळस : येथुन जवळच असलेल्या महातपुरी शिवारातील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झालेला दिसत आहे. नुकसान झालेल्या पिकांची तहसिलदार, तलाठी यांनी पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी मल्हारी सोनकांबळे यांच्यासह शेतक-यांमधून केली जात आहे.
ताडकळस व परीसरात रानडुकरांच्या उच्छादामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. रानडुक्कर शेतातील पिके नष्ट करत आहेतÞ त्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेÞ शेतक-यांनी कसेबसे कर्ज काढून पिकवलेली पिके रानडुकरे जमीन दोस्त केल्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहेत. रानडुकरांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकरी रंगी, बेरंगी साड्या, बुजगावणे आदीचा प्रयोग करीत असूनही रानडुकरांचा उच्छाद कमी होत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.