पूर्णा : येथील वन विभाग अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे पूर्णा तालुक्यात अंबा, लिब, चिंच, पिंपळ, वड या सारख्या महाकाय वृक्षासह लाखों रुपये किमतीच्या सागवान झाडांची बेकायदेशीररित्या कत्तल केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कानडखेड शिवारातील एका शेतामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात सागवान तस्कराकडून संबंधित शेतक-याच्या सहमतीने सागवान झाडांची कत्तल झाल्याची घटना घडली आहे. झोपेचे सोग घेतलेल्या वन विभाग या संदर्भात कारवाई करणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे
पूर्णा तालुक्यात गोदावरी व पूर्णा नदीने मोठा भूभाग व्यापला आहे. अनेक वर्षापासून भली मोठाली महाकाय वृक्ष आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात या वृक्षाची जोपसणा करण्यासह जादा उत्पन्न देणारे सागवान वृक्षाची लागवड केली आहे. सागवान वृक्ष तोंडीसाठी शासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये झाडाची लागवड केल्यावर त्याची सातबारा उतारावर नोंद घेणे, वन विभागास त्याची महिती देणे, झाडे तोडण्यापूर्वी त्याचा रीतसर परवाना घेऊनच झाडे तोडावी अशी नियमावली आहे. असे असताना पूर्णा तालुक्यासह अनेक ठिकाणी बिनबोभाटपणे सागवान झाडाची कत्तल केली जात असल्याचे पहावयास मिळत आहे. पूर्णा ताडकडस रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मध्यरात्री अज्ञात तस्करांनी संबंधित शेत मालकाच्या संगनमताने विनापरवाना 20 ते 25 झाडाची कत्तल करून तस्करी केल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना घडूनही वन विभागाने दुर्लक्ष केल्याने वन विभागाच्या अधिका-यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.