परभणी : मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयातील सेवक म्हणून कार्यरत असलेल्या संतोष गठडी यांनी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि़ २६ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मुलांसह सहकुटुंब भर पावसात आमरण उपोषण सुरू केले आहे.
मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालय येथे संतोष गठडी हे सेवक म्हणून काम करतात़ शिक्षक उपस्थिती पटावर नाव घेऊन शालार्थ आयडी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मुख्याध्यापक एऩबी़सिसोदिया यांनी संतोष गठडी यांना वगळून बाकी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी फेरप्रस्ताव शिक्षण अधिकारी कार्यालयकडे पाठवला असल्याचा आरोप संतोष गठडी यांनी केला आहे.
संतोष गठडी हे दुर्धर आजाराने पिढीत असून त्यांची शारीरिक परिस्थिती बरी नाही़ शालार्थ आयडी मिळण्याकरिता फेर प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडे पाठवल्यास पगार सुरू होईल अशी मागणी संतोष गठडी यांनी केली असून यासाठी कुटुंबियासह आमरण उपोषण सुरू केले आहे.