परभणी : गंगाखेड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात अभियंते सातत्याने गैरहजर राहत असल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी अभियंत्याच्या खूर्चीस हार घालून गांधीगिरी केली.
गंगाखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरु आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह पिठाची गिरणी, वैद्यकीय सेवा कोलमडल्या आहेत. मालेवाडीत पंधरा दिवसांपासून सातत्याने वीज गायब आहे. या संदर्भात अभियंत्यांसह कर्मचा-यांना लक्ष देण्याची आवश्यकता वाटत नाही. कंपनीच्या कार्यालयात भरमसाठ वीज बिलांसह अडचणी सांगण्याकरीता ग्राहकांनी खेटे मारले तरी अभियंते व कर्मचारी भेटतच नाहीत.
त्यामुळेच संतप्त सखाराम बोबडे पडेगावकर, भानुदासराव शिंदे, गणेश चंदेल, श्रीकांत गायकवाड, बंडूसिंग चंदेल, अभिनंदन मस्के, दौलत मुठाळ, आनंद शिंदे, हरि गायकवाड, शिवराज दिडशेरे यांच्यासह संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे कार्यालय गाठून खूर्चीस हार घातला.