परभणी : लॉकडाउनपूर्वी नियमित सुरू असलेली पूर्णा-परळी रेल्वे येत्या काही दिवसांत पूर्ववत सुरू होणार आहे. या रेल्वेचा दोन्ही बाजूला विस्तार करून नांदेड-बिदर अशी चालवण्यात यावी अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने केली आहे.
सायंकाळच्या सुमारास परभणी येथून परळीस रोज अपडाऊन करणा-या हजारो प्रवाशांना सोयीची असलेली पूर्णा-परळी दैनंदिन गाडी लॉकडाऊन नंतर पुन्हा सुरू होणार आहे. या रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र परळी येथून परत येतांना या रेल्वेच्या आधी हैदराबाद-पूर्णा, पंढरपूर-निजामाबाद आणि बेंगलूरू-नांदेड अशा तीन रेल्वेगाड्या उपलब्ध असल्याने परळी-पूर्णा रेल्वे रिकामी धावत आहे.
या रेल्वेला लोकाभिमुख करण्यासाठी पूर्णा-परळी रेल्वेचा नांदेड-बीदर असा दोन्ही बाजूला विस्तार करण्यात यावा. या रेल्वेला नांदेड येथून दुपारी ०३ वाजता रवाना करून परभणी सायंकाळी ०४़४५, परळी वैजनाथ ०६़३०, लातूररोड ०७़४०, उदगीर रात्री ०८़३०, भालकी रात्री ०९़२० तर बीदर येथे रात्री १०़३० पर्यंत पोहचवण्यात यावे. परतीच्या प्रवासात बीदर-नांदेड रेल्वेला बीदर येथून सकाळी ०५ वाजता रवाना करून भालकी ०५़४०, उदगीर ०६़३०, लातूररोड ०७़२०, परळी वैजनाथ ०८़२०, परभणी १०़००, आणि नांदेड येथे दुपारी १२ वाजता पोहचवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ.राजगोपाल कालानी, बाळासाहेब देशमुख, रूस्तुम कदम, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, कादरीलाला हाश्मी, रवींद्र मूथा आदिंनी केली आहे़