परभणी : उन्हाळ््याच्या सुट्यांमध्ये रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने देशभर उन्हाळी विशेष गाड्यांची सोय केली आहे. मात्र, दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणा-या नांदेड विभागाला उन्हाळी विशेष गाड्यांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. याची तत्काळ दखल घेवून नांदेड विभागात उन्हाळी विशेष गाड्यांची सोय करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने नांदेड आणि सिकंदरबाद येथील अधिका-यांना निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड विभागातील सर्व सवारी गाड्यांना पूर्ववत सुरू करावे, राज्यराणी एक्सप्रेसला अतिरिक्त ५ स्लीपर कोच जोडावेत, नांदेड-पनवेल रेल्वेचे २ तासाचे लूज टाईम रद्द करून सदर रेल्वेला नांदेड येथून ७ वाजता सोडावे, नांदेड-हडपसर रेल्वेला पूर्वीप्रमाणे पुणेपर्यंत विस्तार करून दररोज चालवावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या संदर्भात वरिष्ठ प्रवाशी वाहतूक प्रबंधक सत्यनारायण म्हणाले, अमरावती-मुंबई दरम्यान नवीन रेल्वे अकोला-औरंगाबाद मार्गे चालविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
तसेच नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची त्यांनी ग्वाही दिली. तर परळी, लातूर, पंढरपूर, मिरज, बेळगाव, लोंढा जंक्शनमार्गे नांदेड-मडगाव-मंगळुरूपर्यंत नवीन उन्हाळी साप्ताहिक रेल्वे, हिंगोली-नांदेडमार्गे जयपूर-तिरूपती, लातूर-परभणी-नांदेडमार्गे कोल्हापूर-गुवाहटी (आसाम येथील प्रसिद्ध कामाख्य देवी मंदिरला जाणा-या भक्तांच्या सोयीसाठी) दरम्यान नवीन जलद रेल्वे आणि काजिपेट
ते करीमनगर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यात आला असून, काजिपेट-करीमनगर-निजामाबाद-नांदेड-मनमाडमार्गे काजिपेट-मुंबई नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिकंदरबाद येथील अतिरिक्त प्रवाशी परिवहन प्रबंधक चैतन्य, मुरळीधरन नायर, सुरेश, नांदेड विभागातील वरिष्ठ परिचालन प्रबंधक ई श्रीधर यांनी यावेळी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिली. या प्रसंगी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, हर्षद मेहता, शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, ऍड. केदार जाधव, गोविंद कुरंबट्टे, कादरीलाला हाशमी इत्यादी उपस्थित होते.