परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढूनये या दृष्टीने प्रशासनाने मार्च महिन्यातच बंद केलेल्या शैक्षणिक संस्था आता पुन्हा एकदा नव्या जोमाने आजपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी शाळेची घंटा वाजल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. परभणी जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. दरम्यान द्वितीय सत्राच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशही देण्यात आला. दहावी व बारावीच्या परीक्षा जरी झाल्या असल्या तरी दहावीचा भुगोलाचा पेपर मात्र रद्द करावा लागला होता.
तब्बल आठ महिन्यांपासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने शाळेचा परिसर शांत झाला होता. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याची परवानगी शाळा, महाविद्यालयांना दिली. यामुळे विद्यार्थी घरीच राहून अभ्यासात रमू लागली. मात्र शिक्षणाची मजा शाळेत गेल्यावरच असते अशी अपेक्षाही विद्यार्थी व शिक्षकांकडून व्यक्त होऊ लागली. गेल्या तीन महिन्यांपासून ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम सुरू होता. मात्र शाळा बंदच होत्या. राज्य शासनाने गेल्या दोन महिन्यापासून हळूहळू शिथीलता देत सर्व व्यवहार सुरू केले. मात्र मंदिर व शाळा बंदच ठेवल्या होत्या.
दिवाळीतील पाडव्याच्या मुहुर्तावर मंदिरे खुली करण्यात आली. मात्र शाळांबाबतचा निर्णय हा जिल्हास्तरावर ठेवण्यात आला होता. २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना तपासणी झाली नसल्याने २ डिसेंबरपासून महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आज ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांची घंटा वाजली. कोरोना संदर्भातील सर्व नियम व अटींना अधिन राहून शैक्षणिक संस्थानी योग्य ती खबरदारी घेत आजपासून वर्ग सुरू केले. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण दिसून आले.
५० वैज्ञानिकांच्या मदतीला धावले भारतीय हवाईदल