परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी या साईबाबा यांच्या जन्मभूमीसह विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
परभणी येथील फर्न रेसीडेन्सीतील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री मुंडे बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, आ. बाबाजाणी दुर्राणी, आ. सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधीक्षक जयंत मीना, मनपा आयुक्त देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले, परभणी जिल्ह्यातील जांभुळ बेट पर्यटन विकासासाठी ११ कोटी तर पाथरी येथील साईबाबा जन्मभूमी विकासासाठी १५० कोटींचा प्रस्ताव सादर करावा. तसेच यासह नृसिंह मंदिर, दर्ग्याचा पर्यटनामध्ये समावेश करावा. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य शासनाद्वारे आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी शक्य तो पाठपुरावा केला जाईल. तसेच नवा मोंढा पोलिस ठाण्याचा प्रस्ताव देखील सादर करावा, याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
खरिप हंगाम सुरू झाला असून, शेतक-यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. बियाणे व खतांची खरेदी-विक्री सुरु झालेली आहे. जिल्ह्यात बियाणे व खतांची साठेबाजी रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना मुंडे यांनी यावेळी केल्या. या आढावा बैठकीस संबंधित विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.