25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीधनगर टाकळीत गंगा दशहरा उत्सवानिमित्त गंगाआरती

धनगर टाकळीत गंगा दशहरा उत्सवानिमित्त गंगाआरती

एकमत ऑनलाईन

परभणी : ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी या दरम्यान गंगा अवतरणाच्या गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने धनगर टाकळीतील (ता.पूर्णा) गोदावरी नदीच्या काठावर बुधवारी (दि. १) सायंकाळी गंगा आरतीचा उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर, हभप माधवबुवा आजेगांवकर, हभप अवधूत महाराज टाकळीकर व पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, प्रा. अशोकराव सेलगावकर उपस्थित होते.

याप्रसंगी उत्सवाचे आयोजक तथा जलमित्र इंजि. शंकर आजेगांवकर यांनी प्रास्ताविकातून नदीच्या पर्यावरणीय वातावरणात मनुष्यांनी समरस होणे अपेक्षित आहे. सध्या माणसाचा नदीशी संपर्क तुटल्यामुळे नद्यांच्या जपणुकीबद्दलची उदासीनता वाढत आहे. पुलावरुन नदी पाहण्यापेक्षा नदीत उतरुन तिच्या स्पर्श दर्शनाने होणारा अनुभव अत्यंत आल्हाददायक असतो. त्यामुळे गंगा अवतरणाचा उत्सव हा नदी महोत्सव म्हणून गावोगावी साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामान्य लोकांना, शेतक-यांना नद्यांचे महत्व, पावित्र्य कळाले पाहिजे. ते काम प्रत्येकाने कर्तव्य म्हणून केले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी अनेकांनी गंगास्नानाचा अनुभव घेतला. तसेच तीर्थसंकल्प, गंगाआरती, दशहरा दान आदी धार्मिक विधी भाविकांनी उत्साहात केले. याप्रसंगी तुळजादास बोराळकर, टाकळीचे सरपंच साखरे, दीपक कुलकर्णी, संजय वाघ, अजय हामदापुरकर, गिरीश कराडे, विजय वैद्य, संजय पाठक, डॉ. रत्नाकर लोंढे, दीपक पांडे, नरेंद्र शुक्ल, सर्वोत्तम पाथरीकर, श्रीकांत कुलकर्णी, नंदकुमार दैठणकर आदींसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नदीची खणा-नारळाने भरली ओटी…..
धनगर टाकळी येथील वेदशाळेतील वैदिक विद्यार्थी बटूंच्या मंत्रघोषात गोदावरीची विधिवत पूजा करुन खणा-नारळाने नदीची ओटी भरण्यात आली. पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी नदीपात्रात जावून गंगेला साडीचोळी अर्पण केली. यावेळी दीपदानाचे दृश्य नयनरम्य होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या