परभणी : पूर्णा तालुक्यातील जिल्हास्तरीय अक्षर आनंद वाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे करण्यात आले. यावर्षी जिल्हाभरात ८०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यातून जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ७२ उत्कृष्ठ बालवाचकांचा सन्मान तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आला. पूर्णा तालुक्यातील ७ उत्कृष्ट बालवाचकांचा सन्मान झाला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथील सारिका शिवराम शिंदे- प्रथम, साक्षी नागनाथ बेंडे- द्वितीय तर प्रीती बालासाहेब शिंदे-तृतीय, प्रोत्साहनपर पारितोषिक अक्षरा सुंदरराव काळे जि.प.प्रशाला एरंडेश्वर तर प्राथमिक गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर येथील अजय भारतराव सूर्यवंशी- प्रथम, स्वामिनी मोरे-द्वितीय, कृष्णा मोरे- तृतीय यांचा सत्कार जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आंचल गोयल होत्या. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मानवत तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक विनोद शेंडगे हे राज्यभरात सायकल परीक्रमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्याचे आणि वाचनाचे बाळकडू देत आहेत. याचाच भाग म्हणून दरवर्षी जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांवर वाचनाचे संस्कार व्हावेत यासाठी जिल्हास्तरीय अक्षर आनंद पुस्तक वाचन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे यांनी जिल्ह्यात होत असलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची जिल्हाधिकारी गोयल यांना माहिती दिली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, गटशिक्षणाधिकारी मारुती सूर्यवंशी, फुलकळस केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.सिद्धार्थ मस्के, स्पर्धा समन्वयक कैलास सुरवसे, मारुती डोईफोडे, संतोष रत्नपारखे, शिवराम शिंदे, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. वाचन चळवळी विषयी कैलास सुरवसे यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रेमेंद्र भावसार यांनी तर आभार मारुती डोईफोडे यांनी मानले.