परभणी : शिवसेनेअंतर्गत नाराजीसह अन्य घडामोडी निश्चितच उचित नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतेवेळी शिवसेनेचे परभणी येथील खासदार संजय जाधव यांनी हे समज-गैरसमज तातडीने दूर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वारीच्या निमित्ताने आपण पुण्यात होतो. आज उध्दव साहेबांना भेटावयास आलो आहे, असे खासदार जाधव यांनी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नमूद केले. आपण उध्दव साहेबांसोबतच आहोत, असे स्पष्ट करीत शिवसेनेंतर्गत नाराजीबद्दल खंत व्यक्त केली. सर्वच पक्षात कमी-अधिक नाराजी, समज-गैरसमज वगैरे गोष्टी चालतच असतात, असे नमूद करतेवेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका निश्चितच उचित नाही. शिंदे व आपण सोबत काम करत आलो आहोत.
२००४ साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधीमंडळात आलो आहोत. शिंदे व उध्दव साहेब यांच्यातील समज-गैरसमज हे तातडीने दूर व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत उध्दव साहेबांनी जाहीरपणे आवाहन केलेले आहे, असे निदर्शनास आणून दिले. आमदार संजय शिरसाठ यांचे पत्र, त्यातील भाषा उचित नाही, असे मत व्यक्त करतेवेळी खासदार जाधव यांनी सिरसाठ हे तीन वेळा विधीमंडळाचे प्रतिनिधीत्व करत आले आहेत. त्यांच्यासारख्यांनी अशी भाषा वापरणे उचित नाही असा सल्लाही जाधव यांनी दिला.