जिंतूर : तालुक्यातील डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून संपूर्ण डोंगर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दररोज शेकडो वाहनातून मुरमाची व दगडाची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जिंतूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे. शहराजवळील मोठमोठे डोंगर आज नामशेष झाले आहेत. विशेषत: मैनापुरीचा माळ, नेमगिरी परिसरातील डोंगर, ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरातील ३० एकरचा परिसर, जिंतूर परिसरातील डोंगर परिसरातून लाखो ब्रास गौण खनिज उत्खनन केले जात आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
प्रशासन एकीकडे गौण खनिज उत्खनन करणा-या वाहनावर कठोर कारवाई करीत असताना याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे अनेक वाहनातून दिवसा मुरमाची वाहतूक केली जात आहे. माफियांची तालुक्यात मोठी साखळी निर्माण झाली आहे. प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचा-यांना हाताशी धरून अवैध गौण खनिज उत्खननाचा धंदा सुरू आहे. या प्रकारामुळे जिंतूर तालुक्यातील गौण खनिज संपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाचे सर्व नियम व कायदे मोडले जात आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकीकडे प्रशासन महसूल वाढावा म्हणून कडक कारवाई करीत असतानाच दुसरीकडे मात्र चोरट्या मागार्ने अवैध उत्खनन करून प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मुरूम, वाळू व दगडाची चोरटी वाहतूक केली जात आहे. गौण खनिज उत्खनन करणारी जिंतूर शहर व परिसरात दररोज ३० ते ४० वाहने आहेत. या वाहनावर व ट्रॉलीवर नंबर दिसून येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी जिंतूर तालुक्यातून निसर्ग प्रेमीमधून केली जात आहे. आता महसूल प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊन काळातली यशोगाथा, तीन महिन्यात साडे आठ लाख रुपयांच्या शेळ्यांची विक्री