सोनपेठ : सोनपेठ पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत गुरूवार दि़ २८ रोजी काढण्यात आली असून यात अनेकांचा हिरमोड झाला असून कही खुशी कही गम अशी स्थिती पहावयास मिळत आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अरुण ज-हाड यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार गायकवाड, अनिल घनसावंत यांची उपस्थिती होती़ यावेळी शिर्शी(बु.)-अनुसूचित जाती महीला, शेळगाव- सर्वसाधारण, नरवाडी- सर्वसाधारण, कान्हेगाव -सर्वसाधारण महीला, डिघोळ- सर्वसाधारण, नैकोटा-सर्वसाधारण महीला, उखळी(बु.)-नागरिकांचा मागास प्रवर्ग, वडगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला अशी सोडत काढण्यात आली़२००२, २००७, २०१२,मध्ये झालेल्या निवडणुकीत जो अग्रक्रम होता त्यानुसार सदरच्या आरक्षण सोडतीचा निकष ठेवण्यात आला होता.
यावेळी अग्रक्रमनुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दोन जागा होत्या. यात ११ वर्षीय सार्थक घोडके याच्या हस्ते सर्वसाधारण प्रवर्गातील शेळगाव, कान्हेगाव, नैकोटा या जागेच्या चिठ्ठया काढल्या यात कान्हेगाव आणि नैकोटा या जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यावेळी आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिक-यांनी उपस्थिती लावली होती.