Saturday, September 23, 2023

पोटच्या मुलानेच केला वडीलांचा खून

परभणी : दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या ६ तासांत गुन्ह्याची उकल केली असून दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून पोटच्या मुलानेच वडीलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी अशोक मुंजा कटारे (वय २४) यास विचारपूस केली असता आरोपीने वडील मुंजा एकनाथ कटारे (वय ५५) यांचा दिंद्रुड येथे खून करून मृतदेह इंद्रायणी नदीत फेकल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

इंद्रायणी नदी पात्रात मुंजा कटारे यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी मृत इसमासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. हातावर गोंदवलेल्या नावाच्या अनुषंगाने माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील मृत व्यक्ती रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थागुशाचे पथक दिंद्रुड येथे गेले. अवघ्या ६ तासांत आरोपी अशोक कटारे यास निष्पन्न करीत विचारपूस केली असता त्याने संगम पाटी ते दिंदु्रड रस्त्यावर वडीलांना मारून दैठणा हद्दीतील इंद्रायणी नदीत मृतदेह फेकून देवून परत गेल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पो.नि.स्थागुशा वसंत चव्हाण, सपोनि. दैठणाच बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अजित बिरादार, गोपिनाथ वाघमारे, पोलिस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, दिलावर खान, निलेश परसोडे, शेख रफीउद्दिन, राहूल परसोडे, विलास सातपुते, विष्णू चव्हाण, सिध्देश्वर चाटे, परसराम गायकवाड, नामदेव डुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, पोउपनि. संजय वळसे, विनोद मुळे, प्रभाकर विरकर पोलिस स्टेशन दैठणा व सायबरचे बालाजी रेड्डी व गणेश कोटकर यांनी मिळून केली. दरम्यान हा गुन्हा माजलगाव तालुक्यातील असल्याने हे प्रकरण संबंधीत पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या