26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home परभणी दोन्ही डोळ्यांनी अंध लताने सर केले कळसूबाई शिखर

दोन्ही डोळ्यांनी अंध लताने सर केले कळसूबाई शिखर

एकमत ऑनलाईन

परभणी : पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव व अरुणाबाई यांची मुलगी लता दोन्ही डोळ्यांनी अंध आहे़ परंतू दिव्यांग असलेल्या लताने मानसिक मनोबलाच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वात उंच व चढाईला अतिशय कठीण मानले जाणारे 5 हजार 400 मीटरचे कळसूबाई शिखर सर करीत इतरांपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे. नववर्षाच्या पुर्वसंध्येला तिने ही मोहिम फत्ते केल्याने तिचा आत्मविश्वास दुणावला आहे़ विशेष म्हणजे दोन वर्षापुर्वी लताने प्रतापगडही सर केला आहे.

शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींना कळसूबाई शिखर सर करण्यासाठी मोहिम आखून प्रोत्साहित केले जाते. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील 20 जिल्ह्यांतील 70 दिव्यांग युवांना 30 डिसेंबरच्या मध्यरात्री सह्याद्री पायथ्याशी असलेल्या जाहिंगीरदारवाडी गावात एकत्र आणण्यात आले. दुस-या दिवशी सकाळी मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील लता पांचाळ आपल्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत इतर दिव्यांगासोबत लताने शिखर चढण्यास सुरूवात केली़ या मोहिमेत सहभागी दिव्यांग एकमेकांना आधार देत एकमेकांचे मनोबल वाढवत होते.

कळसूबाई शिखर सर करताना शेवटी येणा-या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार करीत नववर्षाच्या पुर्वसंध्येला तिने हे शिखर सर केले. शिखराचा माथा गाठल्यावर सर्वांनी कडाक्याच्या थंडीत तंबूमध्ये मुक्काम केला. नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात सर्वांनी दर्शन घेतले. तसेच उगवत्या सुर्याला नमस्कार करुन सकाळी 10 वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यास सुरुवात केली. शिखरावरुन खाली उतरताना काळजीपुर्वक पावले टाकावी लागत होती. कारण संपूर्ण वाट निसरडी होती, असे लताने सांगितले. मोहिमेत सहभागी सर्व दिव्यांगांना शिवार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र व पदक देवून सन्मानित करण्यात आले.

नव्या वर्षात घरखरेदीवर ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी नाही

जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लता यांना मामा प्रभाकर यांच्या आग्रहामुळे नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग माध्यमिक अंध विद्यालयात पहिली ते आठवीपर्यंत दिव्यांगासाठीचे विशेष शिक्षण घेता आले. त्यानंतर तिने बारापीपर्यंतचे शिक्षण नांदेडला राहूनच पुर्ण केले. त्यानंतर पुढच्या शिक्षणाासाठी तिने पुणे गाठले. एस.पी.कॉलेजमधून बी.ए. केले असून सध्या ती पुण्यातील आकुर्डी भागात रामकृष्ण मोरे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात एम.ए.करीत आहे. विशेष म्हणजे ती एकटीनेच प्रवास करते. परभणी ते पुणे हा प्रवास तर नेहमीचाच़ परंतू एकदा ती डेहराडुनच्या केंद्रीय अंध विद्यालयात प्रशिक्षणासाठी गेली ते देखील एकटीनेच प्रवास करत. तिने कॉम्प्युटरचे अनेक कोर्सेस केलेले आहेत. गावाकडे वडील सुतारकीचा पारंपारिक व्यवसाय करतात. आई गृहिणी असून लताला दोन विवाहित बहिणी व एक भाऊ आहे. सर्वात लहान असलेली लता कुटुंबियांची लाडकी आहे.

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. 5 ते 6 तासांच्या मोहिमेत लताने कळसूबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा परिचय करून दिला आहे. लता पांचाळ हिने 2018 साली पुण्यात इतर मैंत्रिणींकडून ट्रेकींगबद्दल खुपदा ऐकल्याने तिची उत्सुकता वाढली होती. इतर मुली करु शकतात मग आपण का करु शकत नाही? या जिद्दीने तिने दोन वषार्पुर्वी प्रतापगड सर केला होता. महत्त्वाचे म्हणजे ज्या लताला दोन पावले चालायला त्रास व्हायचा तीच युवती आज ट्रेकिंग करत आहे. तिला लहानपणापासून नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. नवीन वर्षानिमित्त अंध मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या कळसूबाई शिखर मोहिमेत सहभागी होण्याचा लताने निर्धार केला आणि हे शिखर सर केले़ या मोहिमेमुळे लताचा आत्मविश्वास दुणावला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या