परभणी : परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केलेल्या रस्त्याची प्रक्रिया निविदा स्तरावर असताना शासनाने त्यावर आणलेली स्थगिती उठवावी अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केली. ही स्थगिती उठवली जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले असल्याचे आमदार डॉ़पाटील यांनी माहिती दिली आहे़
परभणी महानगरपालिका हद्दीत असलेले साडेतेरा किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या रस्त्यांची कामे करण्यासाठी आमदार डॉ.पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु निविदा स्तरावर असताना सरकारने त्यावर स्थगिती आणली आहे़ ही स्थगिती उठून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी व रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावी अशी मागणी आमदार डॉ.पाटील यांनी अधिवेशनामध्ये केली़
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी निविदा स्थगित करण्याबाबतचा कारणांचा आढावा घेऊन स्थगिती उठवली जाईल असे आश्वासन दिले़ त्यामुळे लवकरच स्थगिती उठून शहरातील बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केलेल्या रस्त्यांची कामे सुरू होणार असे आमदार डॉ़पाटील यांनी सांगितले.
परभणी शहरातील बसस्थानक ते रेल्वेस्थानक तसेच श्री शिवाजी महाविद्यालय व पुढे वसमत रोडवर असे तीन स्काय वॉक करा अशी मागणी आमदार डॉ.पाटील यांनी केली. या मागणीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले की, स्काय वॉकचा निर्णय लवकरच घेऊ़ त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाईल असे सांगीतले.
परभणी शहरातून दरवर्षी आषाढी वारीसाठी विदर्भ व हिंगोली जिल्ह्यातील ५०० हून अधिक दिंड्या पंढरपुरला जातात.
यात लाखो वारकरी असतात. त्यांच्या सोईसाठी परभणी शहरात वारकरी भवन बांधावे़ या वारकरी भवनसाठी २० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. बांधकाम मंत्र्यांनी तात्काळ यात लक्ष देऊन वारक-यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आ़डॉ.पाटील यांनी केली. यावर बांधकाम मंत्री चव्हाण यांनी वारकरी भवन गरजेचे आहे. लवकरच यासाठी मंजुरी देऊन निधी देऊ असे आश्वासन दिले.