परभणी : शहर व परिसरात शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने २० मिनिटे जोरदार हजेरी लावली. यामुळे हवेत थंडावा निर्माण झाला आहे.
परभणी जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. नागरिकांनाही उष्णतेचा लाटेचा सामना करावा लागला. गेल्या दोन दिवसापुर्वीच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
मात्र त्यानंतर प्रचंड प्रमाणात गर्मीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाच्या हवामान खात्यानेही शुक्रवारी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ च्या सुमारास आभाळ ढगांनी दाटून आले. हलक्या स्वरूपात वाराही सुटला, त्यातच विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. जोरदार झालेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी उकाडा वाढला आहे.