पूर्णा : रेल्वेच्या दोन ट्रॅकमेनच्या थट्टा मस्करीत झालेल्या वादात एकाने पोटात चाकू खुपसून खून केल्याची घटना रेल्वेच्या पिडब्ल्यूडी कार्यालय परिसरात घडली. कार्यालयाच्या वॉचमनने दिलेल्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार, दि़. १५ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास पूर्णा रेल्वे परिसरात असलेल्या पीडब्ल्यूडी कार्यालय परिसरात ट्रॅकमेन नारायण देवराम आणि सिद्धार्थ अशोक खरे या दोन रेल्वे कर्मचा-यांची आपसात थट्टा मस्करी सुरू होती़ थट्टा मस्करी करता करता दोघाचे भांडण सुरू झाले व एकमेकांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी हाणामारी सुरू झाली़. त्यानंतर सिध्दार्थ खरे यांनी आपल्या जवळील चाकू काढून नारायण देवरामच्या पोटात खुपसला. यात नारायण देवराम खाली खाली पडले़ तेवढ्यात सिध्दार्थ खरे हा घटनास्थळावरून फरार झाला.
यावेळी कार्यालयात उपस्थित वॉचमेन विनोद अशोक काळे आणि इतर कर्मचा-यांनी जखमी पडलेल्या नारायण देवरामास आटोमध्ये टाकून रेल्वेच्या दवाखान्यात नेले़ तेथील डॉक्टरानी प्राथमिक उपचार करून जखमी नारायण देवराम यास नादेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु रस्त्यातच नारायण देवरामाचा मृत्यू झाला़या प्रकरणी वॉचमेन विनोद काळे यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार दिल्यावरून आरोपी सिद्धार्थ खरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनि घाटे हे करीत आहेत.