परभणी : रेल्वे विभागाने एकीकडे पुण्यासाठी दैनंदिन गाडी सुरू केली असताना दुसरीकडे नांदेड- पुणे आणि नांदेड- पनवेल एक्स्प्रेस रेल्वेंचे प्रत्येक ७ डबे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज एक हजारपेक्षा जास्त प्रवाशी पुण्याला जाण्यापासून वंचित राहणार आहेत. वरील दोन्ही रेल्वेंचे डबे कमी करण्यात आल्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे विभागाने दोन्ही गाड्याचे डबे कमी करणे म्हणजे प्रवाशांना एका हाताने देवून दुस-या हाताने काढून घेण्याचा प्रकार आहे़ त्यामुळे दोन्ही एक्सप्रेस रेल्वेच्या डब्यांची संख्या १५ वरून २२ पर्यंत वाढवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आठवड्यातून दोनदा धावणा-या नांदेड-हडपसर रेल्वेला पुणे पर्यंत वाढवल्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळाली आहे़ परंतू ट्रॅव्हल्स चालकांना लाभ पोहचवण्यासाठी नांदेड-पुणे आणि नांदेड-पनवेल रेल्वेतील रॅक एकीकरण केल्यामुळे या दोन्ही रेल्वे गाड्याचे एकुण १४ डबे कमी करण्यात आले आहेत.
त्यामुळे दररोज एक हजारपेक्षा जास्त प्रवाशांना पुण्याला जाण्यापासून बेदखल केले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे गाडी दररोज सुरु होऊन देखील मराठवाड्यातील प्रवाशांना काहीच लाभ होणार नाही. त्यामुळे पुणे जाणा-या प्रवाशी संख्येचे विचार करून वरील दोन्ही गाड्यांच्या डब्ब्यांची संख्या १५ वरून २२ पर्यंत वाढवण्याचे निर्देश द्यावेत़ तसेच तपोवन एक्सप्रेस प्रमाणे दिवसाच्या वेळी पुण्याला मनमाड आणि लातूर या दोन्ही मार्गाने रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच पूर्णा-अकोला मार्गे औरंगाबाद-नागपूर, जालना-औरंगाबाद मार्गे नांदेड-बिकानेर, नांदेड-औरंगाबाद दरम्यान नवीन डेमू लोकल, अकोला-परभणी-लातूर-मिरज मार्गे नागपूर-गोवा, हुबळी मागार्ने नांदेड-मंगळूरू इत्यादी नवीन रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. याशिवाय जनशताब्दी एक्सप्रेसला हिंगोली पर्यंत, बेंगलूरू-नांदेड रेल्वेला नागपूर पर्यंत, पूर्णा-परळी रेल्वेला नांदेड-बीदर पर्यंत, काचिगुडा-रोटेगाव रेल्वेला मनमाड पर्यंत, अमरावती-पुणेला पनवेल पर्यंत, नांदेड-दौंडला पुणे पर्यंत वाढवून पूर्ववत सुरू करण्यात यावेत असेही निवेदनात म्हटले आहे.
मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने नगर-बीड-परळी, जालना-जळगाव, पुणे-नगर-औरंगाबाद, औरंगाबाद-चाळीसगाव, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जालना, नांदेड़-बीदर, वर्धा-यवतमाळ-नांदेड, परभणी-जिंतूर-लोणार-मेहकर-बुलडाणा-मलकापूर-रावेर, जालना-वाशिम-बडनेरा, बीड-वडवणी-माजलगाव-पाथरी-मानवत-परभणी आणि गंगाखेड-पानगाव-लातूर-गुलबर्गा इत्यादी नवीन रेल्वे मार्गांना प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे अशी मागणीही मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिलेल्या निवेदनावर मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा. सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, रुस्तम कदम, बाळासाहेब देशमुख, कादरीलाला हाशमी, वसंत लंगोटे आदिंची नावे आहेत.