परभणी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिका प्रशासनाने ७ ते १० जुलै दरम्यान मराठी व हिंदी नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मनपाचे प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार, आयुक्त रणजित पाटील यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील बी.रघुनाथ सभागृहात मराठी व हिंदी नाट्य महोत्सव होणार आहे. या नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील नाट्य कलावंतांना प्रोत्साहन तर मिळावेच त्यांचे कौतूकही व्हावे या दृष्टीकोनातून विभाग व राज्यस्तरावर विविध महोत्सवांमधून विजेतेपद पटकावलेल्या स्थानिक नाटकांचे, नाट्य कलावंतांचे सादरीकर व्हावे, या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात ७ जुलै रोजी शाक्य सर्वांगिण विकास प्रतिष्ठान परभणी यांच्या नारायण जाधव येळगावकर लिखित व सुनिल ढवळे दिग्दर्शीत यशोधरा या नाटकाचे सादरीकरण रात्री ८ वाजता होणार आहे. ८ जुलै रोजी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रिडा व युवक मंडळ या संस्थेच्या धनंजय सरदेशपांडे लिखित व रवि पाठक दिग्दर्शीत गिव्ह मी सनशाईन या नाटकाचे सादरीकरण दुपारी २ वाजता होणार आहे. तर रात्री ८ वाजता राजीव गांधी युवा फोरम या संस्थेच्या प्रा.रविशंकर झिंगरे लिखित व विनोद डावरे दिग्दर्शीत सृजनमयसभा या हिंदी नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
९ जुलै रोजी नृसिंह माध्यमिक विद्यालय पोखर्णी (ता.परभणी) या संस्थेच्या त्रिंबक वडसकर लिखित व दिग्दर्शीत जगण्याचा खो या नाटकाचे दुपारी ०२ वाजता होणार आहे. क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या धनंजय सरदेशपांडे लिखित व सौ.मनिषा उमरीकर दिग्दर्शीत बुध्दाची गोष्ट या नाटकाचे दुपारी ०४ वाजता तर राजीव गांधी युवा फोरम या संस्थेच्या प्रा.रविशंकर झिंगरे लिखित व विजय करभाजन दिग्दर्शीत ड्रीम्स रिले या नाटकाचे रात्री ०८ वाजता सादरीकरण होणार आहे.
समारोपीय दिवशी म्हणजे १० जुलै रोजी दुपारी ०३ वाजता क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट परभणी या संस्थेच्या प्रा.रविशंकर झिंगरे लिखित व सौ.सुनीता करभाजन दिग्दर्शीत भय रात्री या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. त्याचदिवशी रात्री ०८ वाजता बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रिडा व युवक मंडळ परभणी या संस्थेच्या प्रा.रविशंकर झिंगरे लिखित व मधुकर उमरीकर दिग्दर्शीत उद्रेक या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
या चार दिवशीय नाट्य महोत्सवाच्या दृष्टीने बी. रघुनाथ सभागृहात तसेच परिसरातही रसिकांकरीता अतिरिक्त आसनांची व एलसीडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नाट्यप्रेमींनी या महोत्सवास आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन आयुक्त पवार, अतिरिक्त आयुक्त पाटील, उपायुक्त मनोज गग्गड, उपायुक्त महेश गायकवाड, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, प्रकल्प समन्वयक इफ्तेहारखान पठाण, बी. रघुनाथ सभागृहाचे व्यवस्थापक किशन पैके यांनी केले आहे.